चंद्रपूर:- चंद्रपूरच्या मध्यवर्ती प्रियदर्शनी इंदिरा चौकात पुरुषाचे कापलेले शीर आढळल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अतिव्यस्त आणि गजबजलेल्या परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शनी इंदिरा चौक परिसरात एका पुरुषाचे कापलेले शीर आढळून आले, तर दुसरीकडे रेल्वे उड्डाणपुलाखाली जाहिरातींच्या फलकाजवळ त्याचे धड आढळल्याची माहिती समोर आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात मानवी शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. ही घटना नेमकी कशी घडली? मृत व्यक्तीची ओळख काय? तसेच या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेकडून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविणे, घटनेमागील कारण शोधणे आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
चंद्रपूरच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या धक्कादायक घटनेने शहर हादरले असून, पोलीस तपासातून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



