Chandrapur News : टीपू सुलतान जयंती महानगरपालिकेच्या वतीने अधिकृतपणे साजरी करा! नगरसेवक अजहर शेख यांची मागणी

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी शेरे हिंद टीपू सुलतान यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अजहर शेख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांना निवेदन सादर केले असून, महानगरपालिका परिसरातील टीपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शासकीय पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे.


चंद्रपूर शहरात दरवर्षी महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याच परंपरेनुसार २० नोव्हेंबर २०२६ रोजी टीपू सुलतान यांची जयंतीदेखील महानगरपालिकेच्या अधिकृत कार्यक्रमाच्या स्वरूपात साजरी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अजहर शेख यांनी केली आहे.


या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका परिसरातील टीपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात यावा, तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था महानगरपालिका प्रशासनाने करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम कोणत्याही नगरसेवकाचा किंवा राजकीय पक्षाचा वैयक्तिक कार्यक्रम न राहता महानगरपालिकेचा अधिकृत कार्यक्रम असावा, अशी भूमिका अजहर शेख यांनी मांडली आहे. या आयोजनातून सर्व समाजांमध्ये सामाजिक सद्भावना, बंधुभाव आणि शांततेचा संदेश जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.