Top News

पाणीटंचाई विरोधात घागर फोडो आंदोलन #chandrapur #Movement

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- महानगरात मागील पाच दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवार, 28 मार्चला दुपारी 2 वाजता महानगरपालिकेसमोर घागर फोडो आंदोलन करण्यात आले.
इरई धरणातील पाण्याचा शहराला पुरवठा केला जातो. जलवाहिनी गळतीमुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पाच दिवस लोटूनही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपा प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच घागर फोडून संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले. परंतु, महापालिकेत अधिकारी, पदाधिकारी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे शिष्टमंडळाने शिपाई नाना लांडे यांना मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी तिवारी यांनी, शहरातील पारा 40 अंश सेल्सिअसच्याजवळ पोहोचला आहे. उकाळ्यामुळे जनता आधीच त्रस्त आहे. अशात मागील पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु, या गंभीर समस्येकडे मनपातील सत्ताधारी, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रकाराला मनपाचा नाकर्तेपणा कारणीभूत असून, मंगळवारपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पदाधिकार्‍यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अड्डुर, चंद्रपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सकिना अन्सारी, संगीता भोयर, वीणा खणके, नगरसेवक अमजद अली, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, बापू अन्सारी, प्रवीण पडवेकर, प्रसन्ना शिरवार, स्वाती त्रिवेदी, राजवीर यादव, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, राजेश त्रिवेदी, मनोज खांडेकर, काशीफ अली, मोनू रामटेके, केतन दुर्सेलवार, अशोक जंगम, राहुल चौधरी, सागर खोब्रागडे, भालचंद्र दानव, साबिर सिद्दीकी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने