Chandrapur News: अनंत चतुर्दशीनिमित्त मंडपाच्या जागेवरून भाजपमध्ये वाद; मुनगंटीवार आणि जोरगेवार समर्थक आमने-सामने?

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुका निघाले जातात. या मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून शहराच्या मुख्य रस्त्यांवर मंडप उभारण्यात आले आहेत. मात्र, याच मंडपाच्या जागेवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांमध्ये मंडपाच्या जागेवरून समर्थक आमने-सामने आले. ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

स्वागत पंडालच्या जागेवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष:

मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मुख्य रस्त्यावरील लोकमान्य टिळक शाळेजवळ भाजपचा स्वागत मंडप उभारण्यात येणार आहे. परंतु याच जागेवरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या परवानगीने त्या ठिकाणी तात्पुरते मंडपाच्या उभारले होते. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आणि भाजपचे शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी या जागेवर आक्षेप घेतला. त्यांनी त्याच ठिकाणी भाजपचा अधिकृत मंडप उभारण्याचा आग्रह धरला.

वाद थेट रस्त्यावर, पोलिसांचा हस्तक्षेप:

या वादामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हा वाद महापालिकेतून थेट रस्त्यापर्यंत पोहोचला. मंडपाच्या ठिकाणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने परिस्थिती गंभीर बनली. तणाव वाढल्याने अखेर पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली आणि दोन्ही गटांना शांत करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. या घटनेमुळे शहराच्या राजकारणात भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.