चंद्रपूर:- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसीएच) गंभीर निष्काळजीपणामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन बापूराव भोयर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून केली आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडूनच दोषी डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
ही घटना २२ ऑगस्ट २०२५ रोजी घडली, जेव्हा प्रसूतीसाठी दाखल झालेल्या श्रीमती देवराणी तपन सरकार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे हा प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद आहे. रुग्णालयाच्याच लॅब रिपोर्टमध्ये श्रीमती सरकार यांचा प्लेटलेट काउंट ५५,००० इतका कमी असल्याचे स्पष्ट नमूद असतानाही, डॉक्टरांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. केवळ खाजगी लॅबच्या रिपोर्टवर विश्वास ठेवून, त्यांनी प्लेटलेट कमी असतानाही अत्यंत धोकादायक असा 'स्पायनल ॲनेस्थेशिया' (Spinal Anesthesia) देण्याचा बेजबाबदार निर्णय घेतला. रुग्ण महिलेला चार बॉटल प्लेटलेट्स एक ते दीड तासात जलद गतीने लावण्यात आल्या परंतु ते लावत असताना सुरुवातीचे पंधरा मिनिट पेटलेस हळूहळू वेगाने लावणे आवश्यक होते त्या दरम्यान रुग्णावर कोणते रिएक्शन होत आहेत का ते तपासणे देखील डॉक्टरांचे काम असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
त्यानंतर, रक्तस्राव सुरु असतानाही प्लेटलेट्स वेळेवर दिल्या नाहीत, ज्यामुळे 'ट्रान्सफ्युजन रिलेटेड ॲक्युट लंग इंज्युरी' (TRALI) सिंड्रोम निर्माण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या हलगर्जीपणाची तकार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी दोषी डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट, दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भोयर यांनी केला आहे.
मयत महिलेचे पती देब्रूतो विश्वास यांनी तक्रार दाखल केल्यानंतर अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांनी डॉक्टर जीवने यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली चौकशी समितीच्या अहवालामध्ये उपचारात कोणती चूक झाली नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. जेव्हा की महिलेची तब्येत बिघडत असताना महिलेच्या पतीने वारंवार डॉक्टरांना पेशंट तपासण्याकरिता विनंती केली परंतु डॉक्टरांनी त्याकडे लक्ष दिले नाही. वेळेत आयसीयूमध्ये दाखल केलेले नाही त्यामुळेच महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार केवळ वैद्यकीय चूक नसून, एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे. या प्रकरणी दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जर या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोठ्या संख्येने नागरिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी.