Top News

गोंडपिपरी तालुक्यातील प्रशासनाचा मॉकड्रिल यशस्वी. मात्र तेलंगाणातुन येणाऱ्या लोंढयांचे काय?

सिमाबंदीचा दावा फोल, मजुरांची पायदळी वापसी,  कोरोना विषाणू संसर्गाचा धोका होण्याची शक्यता.
    Bhairav Diwase.   April 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- कोरोना या महामारीच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रा राज्यात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अश्यातच कोरोना संसर्गापासून अबाधित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी तातडीने घेतलेले निर्णय,काळजी याचीच फलश्रुती म्हणून आज चंद्रपूर जिल्हा "कोरोना मुक्त' जिल्ह्यांच्या यादीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेलंगाना राज्यातून पायदळी येणाऱ्या मजुरांच्या लोंढ्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता बळावली असून यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ,कोरपणा, जिवती आणि गोंडपिपरी या चारही तालुक्यांना नजीकच्या तेलंगाना राज्याची सीमा लागून आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातून रोजगाराच्या शोधात तेलंगाना राज्य गाठणाऱ्या मजुरांना लॉकडाऊन मुळे तेलंगानातच अडकून राहावे लागले. सध्याच्या स्थितीत तेलंगाना राज्यातही सुरु असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत मजुरांच्या हाती काम नसल्याने व अन्नधान्य तथा इतर जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याच्या कारणावरून त्या मजुरांनी स्वगृही परतण्याची पायदळी वाट धरली आहे. हे मजूर तेलंगाना व महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीपात्रातून राज्यात प्रवेश करत असून या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे मजुरांच्या आवागमना वरून जाणवते. काल गोंडपिपरी शहरात पोलीस, आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाच्या वतीने झालेला मॉकड्रील यशस्वीरित्या पार पडला. यादरम्यान कोरोना रुग्ण सापडल्याच्या अफवे वरून नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ माजली होती. तर  शहराच्या संपूर्ण सीमा बंद केल्याने वाहतूकदार व सर्व सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली. कारोना संसर्ग झाल्यानंतर घेण्यात येणारी काळजी, कार्यतत्परता याची प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पडली. मात्र हीच तत्परता आता सीमावर्ती भागात कटाक्षाने दाखविणे गरजेचे असून राज्य सीमा सुरक्षित असल्याच्या प्रशासनाच्या दाव्याला तेलंगाना तुन येणाऱ्या मजुरांनी फोल ठरविले  आहे.
तेलंगणातून येणारे मजूर हे बहुतांश प्रमाणात तेलंगाना राज्यातील कोरोना बाधित जिल्ह्यातून येत असून यामुळे कोरोना मुक्त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  लॉकडाऊन परिस्थितीत तेलंगणात अडकलेल्या त्या मजुरांना विलगीकरण दरम्यानच तेथील प्रशासनाने भोजन व्यवस्था म्हणून अन्नधान्य व आवश्यक साहित्य पुरविले मात्र त्यां मजुरांचा विलगीकरण कालावधी पूर्ण होताच प्रशासनाने हात आवरते घेतल्याने मजुरांनी परतीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरू केल्याची ही माहिती आहे. या संदर्भात दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील तालुका व पोलिस प्रशासनाने गंभीरतेने लक्ष घालून मजुरांची आवागमन थांबवावे आणि कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने