शालेय शिक्षण विभागाचे स्पष्ट निर्देश , आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खाजगी शैक्षणिक संस्थांनी फीस संदर्भात तगादा लावल्या बाबत काही पालकांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या कडे तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी चर्चा केली व लॉकडाऊनच्या काळात शाळांची फीस जमा करण्यातून सूट देण्याची मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत शालेय शिक्षण विभागाने दि. 30 मार्च रोजी त्वरित परिपत्रक निर्गमित करून शिक्षण आयुक्त , सीबीएसई सचिव , विभागीय आयुक्त यांना याबाबत सूचना दिल्या आहेत . तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सुद्धा प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.लॉकडाऊन च्या कालावधीत फीस जमा करण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश यासंबंधी देण्यात आले आहेत. पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.