Click Here...👇👇👇

Rambagh tree felling : रामबाग मैदानाजवळ १०० वृक्षांची कत्तल

Bhairav Diwase


चंद्रपूर:- अत्यंत प्रदूषित चंद्रपूर शहरात हिरवळीने नटलेल्या रामबाग मैदानाशेजारील सुमारे १०० वृक्षांची युद्ध पातळीवर कटाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केल्याने चंद्रपूर शहरातील नागरिक पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत. ताड, सिंधी आणि सागवानची चाळीस-पन्नास वर्षांपेक्षा जुनी वृक्षं कापण्यात आली आहेत.


जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी २ एकर जागा उपलब्ध असतानाही प्रशासनाने नवीन जागेवर जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा हट्ट सोडला नाही, असा आरोप रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी केला आहे. नागरिकांच्या तीव्र दबावामुळे रामबाग मैदान सोडण्यात आले असले, तरी मैदानावरील या वृक्षांची कत्तल करून बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.


यापूर्वी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी रामबाग मैदानावर खड्डा खोदण्यात आला होता. त्यानंतर शहरातील जागरूक नागरिक, संघटना-संस्था, क्रीडाप्रेमी, खेळाडू, योगा ग्रुप्स या सर्वांनी महापंचायत घेऊन या ठिकाणी बांधकामाला नागरिकांचा विरोध असल्याचा ठराव सर्वानुमते घेतला होता. स्थानिक आमदार किशोर जोरजेवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी विनायक गौडा यांना या ठरावाची प्रतही देण्यात आली होती. आता जिल्हा प्रशासनाने मैदान सोडले असले तरी, मैदानाशेजारची ही जुनी वृक्षे अक्षरशः कापून काढली आहेत. "हा विकास नसून ही विकृती आहे," अशा संतप्त भावना देशमुख यांनी व्यक्त केल्या.


चंद्रपूरसारख्या अत्यंत प्रदूषित शहरात रामबाग मैदान हे हिरवळ असलेले एकमेव मैदान आहे, त्यामुळे या मैदानाचे आणि त्यावरील नैसर्गिक सौंदर्याला सिमेंट-काँक्रीटच्या विकासाचे नख लागू नये, अशी जनभावना आहे.
प्रस्तावित इमारतीची जागा बदलल्यास कामास विलंब होऊ शकतो, आणि कंत्राटदारांचे काम लवकरात लवकर होऊन त्यांना फायदा व्हावा, या एकमेव हेतूने प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त येत्या २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर १०० वृक्षांची लागवड करून या वृक्षतोडीचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. नवीन इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या जुन्या परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या दोन एकर जागेमध्ये स्थलांतरित करण्यात यावे यासाठी रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचा लढा सुरू राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.