Click Here...👇👇👇

MLA Birthday Banner: आमदारांच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना विजेचा धक्का!

Bhairav Diwase
एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी



सिंदेवाही:- सिंदेवाहीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मृताचे नाव किशोर प्रेमदास पाटील (वय ४८) असे आहे, तर जितेंद्र कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर प्रेमदास पाटील, जितेंद्र कुमार आणि इंद्रजित सोनवणे हे तिघे प्रभाग क्रमांक ४ येथील सुचक यांच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर शुभेच्छा फलक लावण्यासाठी गेले होते. ते शुभेच्छा फलक दोरीच्या साहाय्याने वर खेचत होते. इमारतीच्या वरच्या माळ्यावर फलक आल्यानंतर किशोर पाटील, जितेंद्र कुमार आणि इंद्रजीत सोनवणे यांनी ते पकडले.


इमारतीला लागूनच महावितरणाची वीज तार गेली आहे. फलकाचा जिवंत वीज तारेला स्पर्श झाल्याने किशोर पाटील आणि जितेंद्र कुमार यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खाली कोसळले. हे पाहून इंद्रजित सोनवणे यांनी तत्काळ फलक सोडून दिले आणि खाली कोसळलेल्या दोघांना काय झाले, याची विचारणा केली. जितेंद्र कुमार यांनी प्रतिसाद दिला, मात्र किशोर पाटील यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.


इंद्रजित सोनवणे यांनी तातडीने इतर सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. जखमी सहकाऱ्यांना जवळच असलेल्या बोरकर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान किशोर पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.