Click Here...👇👇👇

Ganeshotsav State Level Competition : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धा

Bhairav Diwase

मुंबई:- पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच दि. 20 जुलै पासून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील.

सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हास्तरीय समिती, या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि उर्वरीत 32 जिल्ह्यांमधून प्रत्येकी एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.