चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव (बु.) येथील विठ्ठल मंदिर वॉर्डात आज सकाळी एका मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केली. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब पत्रुजी दातारकर (वय ५८) असे मृत वडिलांचे नाव आहे. तर अभय गुलाब दातारकर (वय ३४) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वडील घरी बसलेले असताना आरोपी मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले.
या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तात्काळ शेगाव (बु.) पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुमित कांबळे, एएसआय दिनकर घोटेकर, मदन येरणे, निखिल कौरासे, छगन जांभुळे, दिनेश ताटेवार, पोलीस शिपाई संतोष निषाद, प्रशांत गिरडकर आणि प्रगती भगत हे करत आहेत. या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.