वरोरा:- वरोरा शहरातील जुन्या नगरपरिषद समोरील तलावामधील उद्यानात चॉकलेटचे आमिष दाखवून सहा वर्षीय बालकावर नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी दि. 21 जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास समोर आली.
साहिल सुरेंद्र तेलंग (रा. साई मंगल कार्यालय, वरोरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी साहिलवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वरोरा शहरातील गांधी तलाव येथे काही वर्षाआधी रोटरी क्लबद्वारे तलावाच्या मधोमध उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने हे उद्यान रोटरी क्लबने चालवल्यानंतर नगरपरिषदेला हस्तांतर करण्यात आले. नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे या तलावातील उद्यानात अनैसर्गिक कृत्य करणारे व्यसनाधीन मुले-नागरिकांचा येथे वावर असतो.
दरम्यान, सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान साई मंगल कार्यालय येथील साहिल सुरेंद्र तेलंग या आरोपीने एका लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना तेथील काही नागरिकांना माहीत होताच नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.