Murder News: किरकोळ भांडणातून वसतिगृहामध्ये आठ वर्षीय मुलाचा खून

Bhairav Diwase

जालना:- जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एका आदिवासी आश्रम शाळेत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वादातून एका अल्पवयीन मुलाचा त्याच्याच मित्रांनी गळा आवळून खून केल्याची भीषण घटना घडली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, बाल गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गणपती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या दुसरीतल्या अजय पवार या विद्यार्थ्याचा मैदानावर खेळताना तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. हा वाद किरकोळ असला तरी, त्याचा बदला घेण्याचा कट रचण्यात आला.


वादानंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या आदिवासी आश्रम शाळेच्या वसतिगृहात परतले. अजयने संध्याकाळचे जेवण केले आणि नंतर वसतिगृहात जाऊन शांतपणे झोपला.


सकाळी अजय झोपेतून उठत नसल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला असता, तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. अजयचा श्वास थांबल्याचे लक्षात येताच, पोलिसांना घटनेची माहिती देऊन अजयला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


याविषयी पोलिसांना माहिती दिली असता, ते तातडीने घटना स्थळी दाखल झाले. तपास केला असता, घडलेला प्रकार समोर आला. पोलिसांनी विचारणा केली असता, रात्री झोपलेला असतांना अजयचा गळा दाबून खून केल्याने तिसरीत शिकणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांनी कबूल केले. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती समोर येत आहे. दरम्यान, पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.