गडचिरोली:- बंदुकीचा माओवाद संपत चालला असताना दुसरीकडे मात्र शहरी माओवाद सुरू होत आहे. या माओवादापासून आता लोकांनी सावध राहिले पाहिजे. कारण हे माओवादी समाजात 'जमिनी हिसकावल्या', 'जंगलतोड' केली, अशा अफवा पसरवत असून लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे या मानसिकतेला कुणीही थारा देऊ नये, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
लॉयड मेटल्सच्यावतीने कोनसरी येथे आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीच्या विकासावर बोलताना नक्षलवाद आता संपत चालला असून लोकं संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत. लॉयड मेटल्सने आत्मसमर्पित नक्षल्यांना रोजगार दिला आहे. त्यामुळे जंगलातील नक्षलवाद आता संपत आहे पण सरकारविरोधात लोकांना भडकवण्याचे काम शहरी नक्षलवादामार्फत आता सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले.
हे शहरी नक्षलवादी इतर राज्यांमध्ये बसून महाराष्ट्रातील लोकांची अफवा पसरवून दिशाभूल करीत आहेत. या लोकांना विदेशी राष्ट्राकडून दुष्कृत्य घडविण्यासाठी निधी मिळत आहे. जनसुरक्षा कायदा याच शहरी नक्षलवादाविरोधात काम करेल, असेही फडणवीस म्हणाले. 'माओवाद्यांनो शस्त्र खाली ठेवा, संविधानाचा स्वीकार करा', असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवाय पुढे बोलताना ते म्हणाले, गडचिरोली आता बदलत आहे. गडचिरोलीत माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून संविधान स्वीकारल्यामुळेच आज आपण इथे विकासाबाबत बोलू शकतो. उरलेल्यांनी देखील मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.