महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी : आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार.

Bhairav Diwase
भाजपा पदाधिकार्‍यांनी गरजूंना मदत करावी, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले
    Bhairav Diwase.    April 11, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
 चंद्रपूर: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खंबीर सोबतीने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केला, तो अभूतपूर्व आहे. साक्षर झालेला समाज व शिक्षित झालेली स्त्री हे केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या परिश्रमाचे फलित आहे. त्यांचे जीवनचरित्र प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपातर्फे त्यांना ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून मुनगंटीवार यांनी आदरांजली व्यक्त केली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी भाजपा पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मुनगंटीवार म्हणाले, ज्योतिबा फुले यांनी सामाजिक विषमता नष्ट करणे, शेतकर्‍यांना हक्काची जाणीव करून देणे यावर कायम भर दिला. भारतीय ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग साम्राज्यशाहीच्या आर्थिक धोरणांमुळे कसे ढासळले याचे हृदयविदायक वर्णन त्यांनी आपल्या साहित्यातून केले. शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी अवघे आयुष्य खर्ची घातले. त्यांच्याविषयी गौरवपर उद्गार काढताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘निरक्षरता और निर्धनता का बडा गहरा संबंध है’, असे सांगत ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आजन्म केलेला संघर्ष भारतवर्षासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. तसेच ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना माझ्यापरीने लोकप्रतिनिधी म्हणून आदरांजली वाहण्यासाठी विधानसभेच्या माध्यमातून मी प्रयत्न करू शकलो, याचा मला आनंद आहे, असे सांगताना ते म्हणाले, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या वंशजांना न्याय मिळवून देण्यासाठी मी विधानसभेच्या माध्यमातून केलेला संघर्ष फळाला आला. त्यांच्या वंशजांना शासकीय सेवेची संधी मिळाली. पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नांव देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी संसदीय आयुधांच्या माध्यमातुन मी शासनाला भाग पाडू शकलो. पुण्यातील भिडेवाडयाची दुरूस्ती व नुतनीकरण करण्यासाठी मी विधानसभेच्या माध्यमातून प्रयत्न केले, असेही ते यावेळी म्हणाले.

 भाजपा पदाधिकार्‍यांनी गरजूंना मदत करावी.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच राज्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील ताळेबंदीची सिमा वाढली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गरीब व गरजूंची गैरसोय होणार नाही यादृष्टीने योग्य नियोजन करावे, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. सध्या भाजपातर्फे जिल्हयात गरिब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटसचे वितरण, भोजनाची व्यवस्था, सॅनिटायझरचे वाटप अशा विविध माध्यमातून कार्य सुरू आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता लक्षात घेता गरीब व गरजूंना मदतीसाठी अधिक प्रभावी असे नियोजन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे तसेच प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले आहे.