🔴लाखोंचा कापूस जळून खाक :- शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज.
Bhairav Diwase. May 15, 2020
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा नवेगाव ( वाघाडे) येथील श्याम जिनिंगला आग लागल्याने लाखोंचा कापूस जळून खाक झाला असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. सदर घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे.
गोंडपिपरी तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून तालुक्यात एकूण तीन कापूस खरेदी केंद्रे अस्तित्वात आहेत. येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसाची विक्री जोमाने सुरू असून सी सी आय तथा खाजगी खरेदीदाराकडून कापसाची खरेदी सुरू आहे. यामुळे प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर कापूस भरलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. अशातच आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान तालुक्यातील मौजा नवेगाव (वाघाडे) येथील श्याम कापूस खरेदी केंद्र येथे अचानक आग लागली व लाखोंचा कापूस जळून खाक झाला. यात अंदाजे 40 लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे.आग विझवण्यासाठी अग्निशमन साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात आले.