चंद्रपूर जिल्हयातील कृषी पंपांचे प्रलंबित विज कनेक्शन शेतक-यांना तातडीने देण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली.
Bhairav Diwase. May 30, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयातील कृषी पंपांचे विज कनेक्शन मोठया प्रमाणावर प्रलंबित आहेत. शेतक-यांनी तीन महिन्यांपासून विज कनेक्शनसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र अद्याप त्यांना डिमांड देण्यात आलेली नाही. महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाची सबब सांगून शेतक-यांचया मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याची शेतक-यांची तक्रार आहे. चंद्रपूर जिल्हयातील कृषी पंपांचे प्रलंबित विज कनेक्शन शेतक-यांना तातडीने देण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली.
जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरू होतील. त्यामुळे पावसाळयापूर्वी शेतक-यांना मागणीनुसार विज कनेक्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र महावितरण कंपनीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतक-यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. यासंदर्भात एक स्वतंत्र ड्राईव्ह राबवून जिल्हयातील कृषी पंपांचे प्रलंबित विज कनेक्शन शेतक-यांना देण्याची आवश्यकता आहे, असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांना आ. मुनगंटीवार यांनी पत्रे सुध्दा पाठविली आहेत.