बल्‍लारपूर शहराला कचरामुक्‍त शहर म्‍हणून केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचा थ्री स्‍टार दर्जा.

Bhairav Diwase
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूरकर जनतेचे केले अभिनंदन.
 Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
बल्लारपूर:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नगर परिषद क्षेत्र असलेल्‍या तसेच मिनी भारत अशी ओळख असलेल्‍या बल्‍लारपूर शहराला केंद्र शासनाच्‍या नगरविकास मंत्रालयाने थ्री स्‍टार दर्जा (कचरा मुक्‍त शहर) देण्‍यात आला आहे. केंद्रीय गृह आणि नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी आज व्‍टीटर द्वारे ही माहिती जाहीर केली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्‍वास आली आहे. बल्‍लारपूर शहरानजिक देशातील 29 वी सैनिकी शाळा, अत्‍याधुनिक स्‍टेडियम, अत्‍याधुनिक बसस्‍थानक, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन असा विविध विकासकामांचा नवा आयाम आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या शहराला दिला आहे. विशेषतः नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन स्‍वच्‍छतेबाबत विशेष काळजी घेण्‍यात आली असून त्‍यासंबंधाने विविध उपक्रमही राबविण्‍यात आले आहेत. या आधीही रेल्‍वे विभागातर्फे घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेत बल्‍लारपूर येथील रेल्‍वे स्‍थानक देशातील सर्वोत्‍कृष्‍ट रेल्‍वे स्‍थानक ठरले आहे.

बल्‍लारपूर शहराला थ्री स्‍टार दर्जा (कचरा मुक्‍त शहर) देण्‍यात आल्‍याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नगर परिषदेचे अध्‍यक्ष हरीश शर्मा, उपाध्‍यक्षा सौ. मिना चौधरी, मुख्‍याधिकारी विपीन मुद्दा, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी तसेच बल्‍लारपूरकर ना‍गरिकांचे अभिनंदन केले आहे.