कुळमेथे कुटुंबीयांनी गमावला घरातील एकमेव आधार.
Bhairav Diwase. June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम पाथरी, सावली
सावली:- तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत गेवरा खुर्द परिसरातील करोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम चालू असून बांधकामाकरिता पाण्याच्या आवश्यकतेसाठी संबंधित कामाच्या बाजूला कंत्राटदारांच्या सूचनेनुसार १० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. परंतु याच खड्डयाने गेवरा खुर्द निवासी २५ वर्षीय युवक प्रशांत दिलीप कुळमेथे याचा दुर्दैवी बळी घेतला.
सविस्तर वृत्त असे की रोजच्या ठरलेल्या दैनंदिनी प्रमाणे मृत प्रशांत सकाळी साडे सहा वाजता गावाजवळील नाल्याकडे सायकलने शौचाकडे निघाला असता तास दोन तास होऊनही मुलगा घराकडे परतला नाही म्हणून मृतकाचे वडील दिलीप कुळमेथे यांनी नाल्याच्या दिशेने धाव घेऊन शोध घेतला असता पुलाच्या बांधकामावरील नाल्याच्या परिसरात सायकल आढळून आली. आणखी शोध घेतला असता १०० फुटावर पुलाच्या बाजूला असलेल्या खड्डयात मृतकाच्या चपला तरंगताना दिसल्या. त्यामुळे मृतकाच्या वडिलांने लोखंडी सळाखीच्या हुकाने पाण्याने भरलेल्या खड्डयात शोधले असता मृतक प्रशांतचा मृतदेह आढळून आला.
परंतु स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण पातळीवर गावो गावी हागणदारी मुक्त गाव योजना राबवत असता बाहेर जाण्याची गरज मृतकाला भासलीच कशी ? ही योजना फक्त शासकीय कागदोपत्रीच कार्यान्वित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. मृतक आपल्या पश्चात दोन बहिणी आणि वडील मागे सोडून गेला आहे .
घटनेची माहिती तं. मु. स अध्यक्ष हंसराज रामटेके यांनी पाथरी पोलिसांना दिली असून घटनेचा अधिक तपास पाथरी पोलीस स्टेशनचे पीएसआय चव्हाण, पोहवा. देशमुख, नापोकॉ. वडलावार, शिपाई सावे, यांनी प्राथमिक घटनेचा स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले . घटनेचा अधिक तपास पाथरीचे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.