शहरात कडेकोट टाळेबंदी, स्वॅब तपासणीला गती:- आयुक्त राजेश मोहीते

Bhairav Diwase

स्वच्छता व निर्जंतुकीकरणाला वेग.

Bhairav Diwase.    July 20, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्र तसेच चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर, दुर्गापुर ग्रामपंचायत हद्दीत 17 जुलै पासून कडक टाळेबंदी (लॉकडाऊन) सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये महानगरपालिका अंतर्गत शहरात स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच स्वॅब चाचण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. अशी माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली आहे. नागरिकांनी घरामध्ये राहुन लॉकडाऊनचे पालन करावे, बरे वाटत नसल्यास,लक्षणे दिसल्यास तातडीने संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

शहरातील स्वच्छता व निर्जंतुकीकरण:

लॉकडाऊनच्या काळामध्ये महानगरपालिका अंतर्गत शहरातील सर्व वार्डातील नाल्यांची स्वच्छता तसेच कंटेनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहरांमध्ये डीप क्लिनिंग मोहीम शहराच्या विविध वार्डामध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या देखरेखीखाली प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या  माध्यमातून सुरु आहे. तसेच शहरात सातत्याने फॉगींग, फवारणी, नालेसफाईचे काम केल्या जात आहे.महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे, मनपाचे सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शितल वाकडे, विद्या पाटील यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.

जास्तीत जास्त चाचण्या वाढविण्यावर भर :

लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरांमध्ये जास्तीत जास्त आरोग्य तपासणी, स्वॅब चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सारी, आयएलआय तसेच कंटेनमेंट झोनमधील ‌अती जोखमीच्या  संपर्कातील नागरिकांची आरोग्य तपासणी व स्वॅब तपासणी सुरू आहे. या टाळेबंदीच्या काळात जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी आता मोठ्या प्रमाणात अँटीजेन चाचणी सुरू करण्यात आली आहे.

बाहेरून शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची तपासणी:

विदेशातून, परराज्यातून, परजिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी शकुंतला लॉन येथे सुरु आहे. ही आरोग्य तपासणी व संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.आयुक्त राजेश मोहिते यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात शकुंतला लॉन येथील नोडल अधिकारी म्हणुन डॉ. विजया खेरा यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे व त्यांना सहाय्यक म्हणुन शरद नागोसे काम बघत आहेत.

प्रशासनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई:

चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केलेली आहे. यामध्ये मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनापरवानगी दुकान सुरू ठेवणे, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आहे. 17 जुलै पासुन आजपर्यंत मास्क न वापरलेल्या 23 नागरिकांकडून 4 हजार 600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच इतर दंड 100 असा एकूण 4 हजार 700  दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच 17 जुलै रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून 78 हजार 900 रुपये दंड वसूल केलेला आहे. तर एका नागरिकावर एफआयआर दाखल केलेला आहे. 18 जुलै रोजी 16 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.तर तीन नागरिकावर एफआयआर दाखल केलेला आहे.

टाळेबंदीच्या काळामध्ये कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.  घरात ज्याला कोणाला लक्षणे दिसेल त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी, महानगरपालिकेशी  किंवा 1077 व 07172 -261226 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.