शिक्षण, कौशल्याचा उपयोग व्यवसाय उभारणीसाठी करावा:- भैय्याजी येरमे

Bhairav Diwase

जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन साजरा.

स्पर्धा परीक्षा व रोजगार विषयी तज्ञांकडून मार्गदर्शन.
Bhairav Diwase.    July 15, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
चंद्रपुर जिल्ह्यातील युवक-युवतींनी मिळविलेले शिक्षण तसेच कौशल्याचा उपयोग व्यवसाय उभारणीसाठी करावा असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले. यावेळी ते युवक-युवतींना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर कार्यालयाच्या माध्यमातून दिनांक 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन हा जिल्हा स्तरावर साजरा करण्यात येत असतो. परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन पद्धतीने वेबीनारच्या माध्यमातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये साजरा करण्यात आला. या मार्गदर्शन वेबीनार मध्ये जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा व करिअर संबंधी  तसेच रोजगाराच्या संधी विषयीचे मार्गदर्शन अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन चंद्रपूरचे मधुसूदन रुंगठा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले.

दरम्यान, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयीची सविस्तर माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील युवक-युवतींनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी शासनामार्फत कर्ज उपलब्ध केल्या जाते असेही त्यांनी युवक-युवतींना मार्गदर्शनात सांगितले.

एमआयडीसी असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी मार्गदर्शनात जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. कौशल्य असेल तर रोजगाराची संधी मिळत असते तसेच स्वतः स्वयंरोजगार स्थापन करु शकतो. जिल्ह्यामध्ये आणखी नवीन उद्योग यावे यासाठी एमआयडीसी असोसिएशन प्रयत्नशील आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी प्रास्ताविकात जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्त्व, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत चालणारे विविध योजना विषयक माहिती सविस्तर विषद केली.

या कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

दिनांक 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन सहाय्यक नियोजन अधिकारी रूपेश राऊत करणार आहेत. तर दिनांक 17 जुलै रोजी दुपारी एक वाजता करिअर संबंधी मार्गदर्शन प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे सुशील बुजाडे हे करणार आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी https://meet.google.com/vmy-skca-aox या लिंकवर तसेच गूगल मीट ॲपच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.