पाथरीवासीय तसेच प्रहार संघटना मोठ्या प्रमाणात करत आहेत. बाहेरील येणाऱ्या कर्मचार्यांवर तात्काळ प्रतिबंध केले नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
Bhairav Diwase. July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली
सावली:- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील शासकीय कर्मचारी यांनी मुख्यालयी राहण्यासंदर्भात शासकीय अद्यादेश काढले असता ग्रामीण भागात शासकीय कर्मचाऱ्यांकडून त्यांचे पालन होतांना दिसत नाही. शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक ९ सप्टेंबर २०१९ रोजी शासन परिपत्रक क्रमांक. पंरास २०१८/प्र.क्र.४८८/आस्था-७ अध्यादेश काढून त्यात जिल्हा परिषदामार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून कल्याणकारी शासन म्हणून या सेवा राज्यातील जनतेला विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध व्हाव्यात याकरिता जिल्हापरिषदामार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असून प्रामुख्याने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, तसेच शिक्षकांना त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असले तरी शासनाच्या आदेशाला गाजर दाखवून कर्मचाऱ्यांची मनसोक्त मनमानी कारभार चालत असल्याचे दिसून येत आहे.
सध्याच्या काळात सर्वत्र कोरोनाचा विषाणूच्या महामारीने संपूर्ण जग कोरोनाने ग्रस्त झाले असून त्यात राज्य सुद्धा भरडून निघाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात याचे वाढते प्रमाण बघता सावली तालुका यापासून अलिप्त आहे . परंतु गेल्या काही दिवसापासून तालुक्याच्या लगत असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आढावा घेता २७ रुग्ण आहेत. त्यामुळे गडचिरोली, मूल,नागभीड,ब्राह्मपुरी चंद्रपूर आशा अनेक ठिकाणावरून सावली तालुक्यातील पाथरी येथे नौकरी करत असून त्यांचे दररोज ये - जा चालू आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने तसेच चंद्रपूर चे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी दिनांक ११ मे २०२० ला सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश निर्गमित केले होते. आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ नुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. परंतु बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सदर आदेशाचे उल्लंघन केले असून सर्रासपणे सावली तालुक्यातील सेवा असलेल्या पाथरी मुख्यालयी ये-जा करीत आहेत. ग्रामपंचायत कडून रहिवासी दाखले देत फक्त कागदोपत्री मुख्यालय राहण्याचा देखावा या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे सावली तालुक्यातील पाथरी गावात कोरोना या विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . भविष्यातील धोका टाळण्यासाठी इतर जिल्हा व तालुक्यातून नोकरीनिमित्त पाथरी मुख्यालयी येणार्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालावा व मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी पाथरीवासीय तसेच प्रहार संघटना मोठ्या प्रमाणात करत आहेत. बाहेरील येणाऱ्या कर्मचार्यांवर तात्काळ प्रतिबंध केले नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.