Top News

आ. बच्चू भाऊ कडू यांनी दत्तक घेतली चंपाकली हत्तीला.

हत्तीणीला दत्तक घेणारे बच्चू कडू हे पहिले व्यक्ती ठरले.
Bhairav Diwase.    July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथे पर्यटकांच्या सेवेत असलेली चंपाकली नामक हत्तीण शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना भावली. त्यांनी पत्नी नयना कडू यांच्या उपस्थितीत २१ हजार ५०० रुपये व्याघ्र प्रकल्पाकडे नगदी भरून तिला दत्तक घेतले आहे.
आता ही चंपाकली ना. बच्चू कडू यांच्या नावे ओळखली जाणार आहे. तिला घरी नेता येणार नाही; पण आपला दत्तक हत्ती कसा राहतो, त्याची देखभाल कशी ठेवली जाते, त्याची दिनचर्या काय, त्याला खायला काय दिले जाते, आरोग्याची काळजी कशी घेतली जाते, यांसह अन्य बाबींची माहिती ना. कडूंना घेता येणार आहे. या चंपाकलीला भेटण्याची मुभा त्यांना राहणार आहे. ते मेळघाटात पोहोचल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था व्याघ्र प्रकल्पाकडून विनामूल्य केली जाणार आहे.

         मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोलकास येथे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री आणि सुंदरमाला नामक चार हत्तिणी आहेत. २२ फेब्रुवारी २०१८ पासून हत्तीण दत्तक योजना आणली गेली. २१ हजार ५०० रुपयांत एक महिन्याकरिता हत्तीण दत्तक देण्याचे निश्चित केले गेले. ज्या कुणाला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीकरिता हत्तीण दत्तक घ्यावयाची असेल, त्या पटीत ती दत्तक विधानाची रक्कम व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनकडे भरावी लागते. कुणालाही या चारपैकी कुठल्याही हत्तीणीला दत्तक घेता येते.
हत्ती दत्तक घेणाऱ्याला आयकरात ८० टक्के सूटसुद्धा मिळते. ग्रीन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत वॉन्ट टू अ‍ॅडॉप्ट ए मेळघाट का हाथी ही योजना पुढे आली. या दत्तक योजनेतून हत्तीणीला लागणारे राशनपाणी व अन्य खर्च भागविला जातो.

बच्चू कडू पहिले पालक
२०१८ पासून ही दत्तक योजना असली तरी आतापर्यंत कुणीही पुढे आलेले नाही. दत्तक घेण्याचे आवाहन व्याघ्र प्रकल्पाकडून देशभर केले गेले. मात्र, हत्तिणीला दत्तक घेणारे बच्चू कडू हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.

इंदिराजीनंतर बच्चू कडू कोलकास येथील वनविश्रामगृह तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुक्कामाने नावारूपास आले आहे. इंदिरा गांधींचा तो कक्ष बघणारे पर्यटक आजही आहेत. या वनविश्रामगृहाला इंदिराजींमुळे वेगळी ओळख मिळाली. आज कोलकास येथील या चंपाकलीला बच्चू कडू यांनी दत्तक घेतल्यामुळे कोलकास येथील हत्तीलाही नवी ओळख मिळाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने