Top News

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरागेवर यांना जिवे मारण्याची धमकी.

अवैध दारूविक्रेत्यांनी ही धमकी दिली असल्याचा संशय असून दारुविक्री बंद करण्यासाठी आमदार करत असलेल्या प्रयत्नांचा या पत्रात विरोध करण्यात आला आहे.
Bhairav Diwase. July 22, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. अवैध दारूविक्रेत्यांनी ही धमकी दिली असल्याचा संशय असून अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी आमदार करत असलेल्या प्रयत्नांचा या पत्रात विरोध करण्यात आला आहे. मिलन चौक परिसरात असलेल्या कार्यालयात हे पत्र येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि पोलिसात याची तक्रार केली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांना आलेल्या या लेखी धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात होणाऱ्या दारू तस्करी बाबत नाराजी दर्शवत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती होती ज्यानंतर पोलिसांनी दारू तस्करी करणाऱ्या अनेक मोठ्या आरोपींवर कारवाई केली होती.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर दारू तस्करीचे एक मोठे क्षेत्र गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना खुले झाले. दारू तस्करीतून मिळणारा मोठा फायदा आणि अतिशय कमी रिस्क यामुळे अनेक नवीन लोकं या धंद्याकडे आकर्षित झाली. सुरुवातीला असंघटीत असलेला हा व्यवसाय आता राजकीय आणि प्रशासनिक पाठिंब्यामुळे संघटीत होत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील चंद्रपूर शहरात सर्रास दारू येत असल्याचा आरोप किशोर जोरगेवार यांनी केला होता.

किशोर जोरगेवार यांनी केलेली तक्रार आणि त्यानंतर दारू तस्करांवर झालेली कारवाई यामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले आणि त्यातूनच आमदाराला जीवे मारण्याची धमकी देणारे हे पत्र लिहिण्यात आले असावे अशी शंका आहे.

किशोर जोरगेवार यांच्या मिलन चौक परिसरात असलेल्या कार्यालयात मंगळवारी दुपारी एक पत्र आले आहे. हे पत्र चंद्रपूर शहरातूनच पोस्ट करण्यात आल्याचा त्याच्यावर शिक्का आहे. विशेष म्हणजे या पत्रात दारू तस्कर हे गरीब आणि बेरोजगार असल्याचे म्हणत किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या पोटावर पाय देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. दारू तस्करी करणे हा जणू काही या गरीब आणि बेरोजगार लोकांचा हक्क असल्याचे म्हणत पत्र लिहिणाऱ्याने आमदार आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने