आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
चिमूर:- चिमूर तालुक्यातील भिसी अप्पर तालुका अंतर्गत पिंपळगावजवळील परसराम मंदिरात रात्रीच्या वेळी अघोरी पूजा करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिनही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.7 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता पिंपळगाव येथील रहिवासी अतुल श्रीरामे हे पिकांना पाणी देण्याकरिता मोटरपंप सुरू करण्यासाठी जात होते. दरम्यान रस्त्यात गावकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या परसराम मंदिरात अंधारात त्यांना आवाज ऐकू आला. जवळ जाऊन बघितले तर तीन लोक मंत्रोपचार करून अघोरी पूजा करीत होते. अतुलने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर, त्यास धाक दपट करून हाकलून देण्यात आले. दरम्यान अतूलने मंदिरात कसली तरी विचित्र पद्धतीने पूजा सुरू असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थ मंदिराकडे गेले तर पूजा करणारे तेथून फरार झाले होते. अतुल श्रीरामे यांच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंदिरात अघोरी पूजा करणारे पिंपळगाव निवासी विनायक बाजीराव नन्नावरे, देवराव गंगाधर धारणे व शत्रुघ्न भीकू धारणे यास अटक करून त्यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सचिन जंगम करीत आहे.