बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलात खेलो इंडिया सेंटरला लवकरच मंजुरी मिळणार.

केंद्रीय क्रिडा राज्‍यमंत्र्यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन.
Bhairav Diwase. Aug 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलात खेलो इंडिया सेंटर अर्थात स्‍पेशल एरिया गेम्‍स सेंटर सुरु करण्‍यासाठी केंद्र सरकारच्‍या क्रिडा व युवक कल्‍याण मंत्रालयातर्फे लवकरच मंजुरी देण्‍यात येणार असल्‍याचे आश्‍वासन भारत सरकारच्‍या युवक कल्‍याण व क्रिडा विभागाचे राज्‍यमंत्री श्री. किरेन रिजीजु यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

या संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय क्रिडा मंत्रालयाशी सतत पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय क्रिडा राज्‍यमंत्री श्री. किरेन रिजीजु यांच्‍याशी नुकतीच दुरध्‍वनीद्वारे चर्चा केली. बल्‍लारपूर शहरानजीक सर्व अत्‍याधुनिक क्रिडा विषयक सुविधांनी परिपूर्ण असलेले स्‍टेडीयम अर्थात बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल बांधण्‍यात आले आहे. अभिनेते आमिर खान यांच्‍या हस्‍ते या स्‍टेडीयम उद्घाटनही करण्‍यात आले आहे. या स्‍टेडीयम मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील सर्व खेळांशी संबंधीत क्रिडा विषयक पायाभूत सुविधा उपलब्‍ध आहेत. 2024 मध्‍ये होणा-या ऑलीम्‍पीक स्‍पर्धेसाठी चंद्रपूर जिल्‍हयातील खेळाडू तयार व्‍हावे यासाठी मिशन शक्‍ती या उपक्रमाअंतर्गत हे स्‍टेडीयम कार्यान्‍वीत करण्‍यात आले आहे. या ठिकाणी खेलो इंडिया सेंटर अर्थात स्‍पेशल एरिया गेम्‍स सेंटर सुरु केल्‍यास खेळाडूंना आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे क्रिडा विषयक प्रशिक्षण मिळेल व त्‍यांच्‍या क्रिडा कौशल्‍यात भर पडेल, अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय क्रिडा राज्‍यमंत्री श्री. किरेन रिजीजु यांच्‍याशी झालेल्‍या चर्चे दरम्‍यान व्‍यक्‍त केली. बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलात खेलो इंडिया सेंटर लवकरच सुरु करण्‍याच्‍या दृष्‍टीने मंजुरी देण्‍यात येईल असे आश्‍वासन श्री. किरेन रिजीजु यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने