पोडसा येथील घटना वन्यजीव प्रेमींकडून नाराजी.
Bhairav Diwase. Aug 02, 2020
गोंडपिपरी:- गावशिवारात घुसलेल्या चितळांच्या पाठलाग गावकुत्र्यांनी केला. एका चितळाने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. तर दुसरा चितळ गावात शिरला. चितळाला वाचविण्यासाठी गावकर्यांनी प्रयत्न केले. पण, कुत्र्याच्या हल्ल्यात चितळ गंभीर जखमी झाला आणि काही क्षणात तो मृत्यूमुखी पडला. ही घटना रविवार, 2 ऑगस्ट रोजी घडली.
महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवरील पोडसा गावातील वर्षभरपूर्वीच्या वाघ मृत्यूची चर्चा चांगलीच रंगली. या वाघ मृत्यूचे कारण वर्षभरानंतर वनविभागाला अजूनही गवसले नाही. आता गावालगत असलेल्या कपाशीत चितळ घुसले. कपाशीवर ताव मारण्यासाठी आलेल्या या दोन चितळांवर कुत्र्यांनी हल्ला केला. यातील एका चितळाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली, तर दुसरे गावात घुसले.
त्यांचेवर गावकुत्रांनी हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. लागलीच गावकर्यांनी वनविभागाला ही बाब सांगितली. माहिती मिळूनही 2 तासानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यात जखमी चितळाचा जीव गेला. उपचाराअभावी चितळाचा मृत्यू झाला. सध्या शेतशिवारात कपाशी आणि धानपिके उभे आहेत. कपाशी पिकांवर ताव मारण्यासाठी वन्यजीवांचे कळप शेतावर तूटून पडत असल्याने चित्र आहे. गोंडपिपरी तालुक्याचा बराच भाग जंगलालगत आहे. त्यामुळे वन्यजीव गावात शिरकाव करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
वनकर्मचार्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी पोडसा ग्रामपंचायतचे उपसरपंच देविदास सातपुते यांनी केली आहे.