Top News

शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन १५ ऑगस्ट पर्यंत सादर करा:- राहुल कर्डीले

रविवारी घेतला सर्व शाळांच्या कामकाजाचा आढावा.
Bhairav Diwase.    Aug 02, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांची सुरुवात ऑगस्ट महिन्यात करण्याबाबतच्या शक्यतेचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आज घेतला. अनेक शाळांची तयारी अपेक्षेनुरूप नसून यासंदर्भात पुढील 15 ऑगस्ट पर्यंत नियोजन सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांच्या नुकसानाला लक्षात घेऊन पालक मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा 4 ऑगस्ट पासून सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. कोरोना पार्श्वभूमीच्या काळामध्ये खाजगी शाळा ऑनलाईन पद्धतीने, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करीत आहेत. अशा वेळी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिकदृष्ट्या तातडीने मदत मिळावी यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला होता. 
तथापि, सद्यस्थितीमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो काय याचा आढावा गेल्या चार दिवसांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी घेत आहेत. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्ह्यातील शिक्षण तज्ज्ञांसोबतही मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी चर्चा केली आहे.
राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. मात्र या परिस्थितीत जिल्ह्यांमध्ये काही शाळांमध्ये अभिनव प्रयोग सुरू असून शिक्षक घरी जाऊन मुलांना शिकवत आहेत. काही ठिकाणी काही शिक्षकांनी मुलांना ऑनलाईन संवाद साधने सुद्धा सुरू केले आहे. अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट तयार केले आहेत. तर काही ठिकाणी गावांमध्ये फेरफटका मारून शिक्षक विद्यार्थ्यांची संवाद साधत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे पुढे आले आहे.
१५ ऑगस्टला शाळांकधी सुरू करता येईल याबाबत पुन्हा एकदा या संदर्भातील आढावा घेतला जाणार आहे. नियोजन तपासले जाणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय घेतला जाईल. शासकीय आदेशानुसार शाळा सुरू करताना जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा, शाळांमधील कोरोना कॉरेन्टाइनची समस्या व कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यासाठीची उपाययोजना, यासाठी आणखी काही वेळ लागेल असे लक्षात आले आहे. त्यानुसार पुढील 15 तारखेनंतर या संदर्भातील आढावा घेऊनच निर्णय घेतला जाईल ,असेही मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने