सिडीसीसी बॅंक मेंडकी शाखेतील फसवणूक प्रकरणी 3 आरोपींना अटक.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- मृत खातेदाराचे बनावट अंगठे मारून त्याच्या खात्यातील सुमारे एक लाख 30 हजार रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा मेंडकी येथे उघडकीस आला.
याप्रकरणी सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक साजन साखरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रवींद्र भोयर (वय 55, रा. नागभीड), अमित राऊत (वय 36, रा. ब्रह्मपुरी), कल्पना मसराम (वय 35, रा. ब्रह्मपुरी) यांना अटक केली आहे. व्यवस्थापक अमित नागपुरे, लिपिक संजय शेंडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
मेंडकी येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील एका खातेदाराचा मृत्यू झाला.
त्याच्या खात्यातील रोख रक्कम तसेच शासनाकडून आलेल्या निधीची रक्कम रवींद्र भोयर, अमित राऊत, कल्पना मसराम यांनी पदाचा दुरुपयोग करून, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्या खात्यात वळती केली. तसेच खातेदाराचे बनावट अंगठे, सही मारून रकमेची उचल केली. याप्रकरणाची तक्रार सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक साजन साखरे यांनी पोलिस ठाण्यात केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अमित नागपुरे, संजय शेंडे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आता रवींद्र भोयर, अमित राऊत, कल्पना मसराम या तिघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख 30 हजार रुपये जप्त करण्यात आले. ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मकेश्वर, सहायक फौजदार बिंदूप्रसाद चांदेकर करीत आहेत.