बोगस दस्ताऐवजाच्या आधारे शेतजमीन खरेदी.

Bhairav Diwase
नांदा येथील मोहम्मद हारून सिद्दीकी यांचा प्रताप; विस महिन्यापासून कार्यवाही नाही.
 Bhairav Diwase. Oct 15, 2020
(संबंधित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नांदा गावातील प्रस्थ मोहम्मद हारून सिद्दीकी अल्लाउद्दीन सिद्दिकी यांनी नांदा येथील भूमापन क्रमांक ३४ मधील ०.६० हेक्टर शेतजमीन खरेदी केली.
 श्री. मोहम्मद व हनुमान भेसुराम चौधरी यांचेकडून ही शेतजमीन घेताना सिद्दिकी यांनी कोरपना तालुक्यातील जेवरा या गावातील सर्व्हे क्रमांक १९/२ चा सातबारा स्वतः च्या नावे असल्याचे दाखवले. या खोट्या सातबारा दस्ताऐवजाच्या आधारे शेतजमिनीचे विक्रीपत्र स्वत: च्या नावे करत मदन बेसुराम चौधरी नामक शेतकऱ्याला भूमिहीन केले. सदर बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते पवन छोटेलाल यादव यांनी संपूर्ण दस्ताऐवजासह तहसीलदारांकडे तक्रार केली. सदर प्रकरणात असलेल्या जेवरा येथील वादांकित सातबारविषयी तहसीलदार कोरपना यांनी संबंधित तलाठी यांना खुलासा मागितला . 
 तलाठी यांनी खुलासा देताना असे सांगितले की, " मौजा जेवरा येथील शेत सर्व्हे क्रमांक १९/२ आराजी ३.२१ हे.आर. चा सातबारा मोहम्मद हारून सिद्दीकी यांनी स्वतःच्या नावे फसवणूक करून घेतला असावा. कारण, हा सातबारा घेण्यासाठी सिद्दीकी कधीही तलाठी कार्यालयात आला नाही. हा सातबारा बनावट असल्याचे देखिल त्यांनी म्हटले. तसेच, वादांकीत सातबारातील गावाचे नाव व भोगावटदाराचे नाव या अक्षरांत तफावत असल्याची बाब निदर्शनास आली. हा सातबारा जेवरा येथील नामदेव भोयर व सुधाकर भोयर यांच्या नावाचा असल्याचे निष्पन्न झाले. " एकंदरीत तलाठी यांना तहसीलदार यांचेकडून २०१९ साली जानेवारी महिन्यात अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर बनावट दस्ताऐवजाच्या आधारे विक्रिपत्र केल्याप्रकरणी मोहम्मद हारून सिद्दिकी यांची फेब्रुवारी महिन्यात तहसीलदार कार्यालयात पेशी झाली. 
 तब्बल २० महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असून अद्याप तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. 
मोहम्मद हारून सिद्दिकी अल्लाउद्दीन सिद्दिकी यांच्या नावे असलेला जेवरा येथील सातबारा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या आधारावरच नांदा येथील भूमापन क्रमांक 34 पैकी ०.६१ आर जमीन खरेदी केल्याचे दस्ताऐवज दुय्यम निबंधक कार्यालयातून प्राप्त झाले. संपूर्ण प्रकरणात खोट्या दस्ताएेवजाच्या आधारे विक्रीपत्र करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत असताना सदर खरेदी खत रद्द करणे, संबंधित मोहम्मद हारून सिद्दिकी यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करणे आणि भूमिहीन झालेल्या चौधरी नामक शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे अपेक्षित आहे . मात्र २० महिन्यांपासून तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी कोणतीही कडक कारवाई केली नाही. त्यामुळे तहसीलदार यांच्यावर कोणाचे राजकीय दडपण आहे का असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पवनदिप छोटेलाल यादव यांनी सांगितले. 
सदर प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रांसहित जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार दिली असून जर प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य पाऊले उचलली नाही तर वेळप्रसंगी न्यायालयाचा मार्ग अवलंबावा लागेल असेही पवनदिप यादव यांनी सांगितले. तर नांदा गावात होत असलेल्या अनधिकृत कामाविरोधात सातत्याने आवाज उचलून लोकांच्या सेवेसाठी तत्पर असेल आणि सिद्दीकी यांचेवर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही अशे मनसेचे नेते प्रकाश बोरकर यांनी सांगितले.
दरम्यान तहसीलदार कोरपना काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले आहे.