कवि श्रीपाद जोशी यांच्या चोरकप्पा या नव्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:- हा चोरकप्पा प्रेमानं ओथंबलेला आहे. यात विविध गोष्टी आहेत. श्रीपाद जोशी यांनी कवितांच्या माध्यमातुन त्या गोष्टींना दृश्य रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. या दर्जेदार व उत्तम कविता संग्रहाचे रसिक वाचक निश्चीतपणे स्वागत करतील असा विश्वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाटककार, रंगकर्मी, कवि श्रीपाद प्रभाकर जोशी यांच्या चोरकप्पा या कविता संग्रहाचे प्रकाशन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोकसत्ता नागपूरचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांची उपस्थिती होती. सामाजिक भान बाळगून लेखन करणे विशेषतः काव्य लेखन करणे हा अवघड भाग आहे. मात्र श्रीपाद जोशी यांनी सातत्याने यशस्वीपणे कविता लेखन करत केलेली साहित्याची सेवा महत्वाची असल्याचे प्रतिपादन देवेंद्र गावंडे यांनी केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशन सोहळा मोठया प्रमाणावर आयोजित करता येवू शकला नाही याची खंत व्यक्त करत कवि श्रीपाद जोशी यांनी ज्यांनी कायम माझ्या कवितांवर प्रेम केले त्या सुहृदांच्या उपस्थितीत या कविता संग्रहाचे प्रकाशन होत आहे ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे आपल्या मनोगतात सांगीतले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शाल, श्रीफळ देत कवि श्रीपाद जोशी यांचा सत्कार केला. कवयित्री प्रा.डॉ. पदमरेखा धनकर यांच्या ‘फक्त सैल झालाय दोर’ या कविता संग्रहाला प्रतिष्ठेचा रेंदाळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अजय धवने यांनी केले.
कार्यक्रमाला प्रा. डॉ. जयश्री कापसे-गावंडे, किशोर जामदार, अॅड. वर्षा जामदार, विनोद दुर्गपुरोहीत, रवि जुनारकर, सुभाष कासनगोट्टूवार, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. चोरकप्पा हा कविता संग्रह पुण्याच्या संवेदना प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आला असून ज्येष्ठ नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार अभिराम भडकमकर यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. हा कविता संग्रह बुकगंगा वर उपलब्ध आहे.