वाघाचे दात व नखे विकणारे 2 आरोपी अटकेत.

Bhairav Diwase
ब्रम्हपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्राची कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दि. 03/11/2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता वन विभागास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार, सिंदेवाही परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी योजना आखुन दि. 03/11/2020 रोजी रात्रौ 11.00 वाजताच्या सुमारास मौजा रत्नापुर येथे श्री. वामन महादेव लोखंडे यांचे घरावर धाड टाकली. घराच्या छतावर एक व्यक्ती अंधारात संशयीतरित्या लपलेला आढळला. त्यास विचारणा केली असता, त्याने त्याचे नांव श्री. रोशन वामन लोखंडे, रा. रत्नापुर असल्याचे सांगितले. व 10 मिनीटापुर्वी श्री. संजय सुखदेव परचाके, रा . रत्नापुर हा त्या ठिकाणावरून वाघाचे दाते व नखे घेवून फरार झाला असल्याचे सुध्दा सांगितले. 

    तेव्हा उपस्थित वनकर्मचाऱ्यांनी श्री. संजय परचाके यांचे घरी जावून त्यास बोलावना केले असता, तो श्री. लोखंडे यांचे घरी परत आला. दोघांची चौकशी केली असता, त्यांनी कजली करीता किंवा विकण्या करीता वाघाचे 2 दात व 10 नखे असल्याचे सांगितले. श्री. संजय सुखदेव परचाके, रा. रत्नापुर यांनी खताच्या खड्डयात लपवुन ठेवलेले 2 दात व 10 नखे दाखविले. वाघाच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. शेती करीता लावलेल्या विद्युत करंटव्दारे वाघाचा मृत्यू झाला असून, त्याचे मुंडके ( शिर ) व पंजे तोडून दात व नखे काढून काही अवयव नदीत पाण्यात फेकले तर उर्वरित अवयव नदी पात्रात पुरून ठेवले असल्याचे वरील आरोपींनी सांगितले. 
    

       वरील दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची वन कोठडी सुनावली असून प्रकरणात पुढील चौकशी/ तपास सुरू आहे. सदर मोहीमेत श्री दिपेश मल्होत्रा उपवनसंरक्षक ब्रम्हपुरी, कु. आर. ए. बोंगाळे सहायक वनसंरक्षक ब्रम्हपुरी, वनविभाग ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात श्री. ए. आर. गोंड वनपरिक्षेत्र अधिकारी , सिंदेवाही, श्री. एस. वाय‌. बुल्ले क्षेत्र सहायक नवरगांव व इतर वनकर्मचारी तसेच STPF मुल ची चमु यांनी पार पाडली.