Top News

चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाचे सुविधा केंद्र सुरु होणार.. !!

लोककलेचे स्वतंत्र अभ्यासक्रमही होणार सुरू.
 
डॉ. आंबेडकर, दीनदयाल उपाध्याय अध्यासनाचे कार्य सुरू.
Bhairav Diwase. Nov 28, 2020


चंद्रपुर:- कोवीडमुळे यंदा गोंडवाना विद्यापीठाची दुसरी अधिसभा आभासी पध्दतीने मात्र, अत्यंत खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात बुधवार, 25 नाव्हेंबर रोजी पार पडली. नजीकच्या काळात चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र होऊ शकत नसले, तरी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच विद्यापीठाचे सुविधा केंद्र स्थापन होणार आहे. 


त्यासाठी कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी 4 सदस्यीय समिती गठित केली आहे. त्याचसोबत लोककलेचे स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीनदयाल उपाध्याय अध्यासन केंद्राचे काम सुरू करण्याबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आला.


कोवीड संकटात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यासंबंधी विद्यापीठाने पुढाकार घेतला आणि ती अत्यंत सुरळीतपणे पारही पाडली. या नियोजनासाठी कुलपती भगतसिंग कोेश्यारी यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वरखेडी यांचे कौतुक केले असून, या यशासाठी या अधिसभेत सर्व सदस्यांनी कुलगुरूंचे अभिनंदन केले. डॉ. वरखेडी यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही पहिलीच सभा होती. तीही प्रत्यक्ष घेता येत नसल्याने आभासी पध्दतीने घेतली गेली. 


सुरूवातीला ही सभा व्यवस्थित पार पडेल की नाही, की नागपूर विद्यापीठासारखी ती रद्द करावी लागेल, अशी शंका होती. पण डॉ. वरखेडी यांनी ती अत्यंत सकारात्मक पध्दतीने पार पाडली. त्यांनी सदस्यांशी केलेल्या संवादाचेही सर्वांनी कौतुक केले. दशमान उत्सवात विविध आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय वक्त्यांना आमंंत्रित करून व्याख्यानमाला घेण्याची योजना कुलगुरूंनी मांडली. 


तसेच त्यांच्या अल्पकाळाचा अहवालही सादर केला. विद्यापीठाच्या सुव्यस्थापनासाठी विविध प्रश्‍नांच्या माध्यमातून सिनेट सदस्यांनी विषय रेटले. जवळपास सर्वच विषयांत कुलगुरू सकारात्मक असल्याने सभेत पहिल्यांदाच गोंधळ झाला नाही. कारण यापूर्वीच्या सभा अक्षरश: गाजायच्या.

विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये ‘भारतीय संविधान’ अभ्यासक्रम असावे, चंद्रपूर येथे विद्यार्थी मदत केंद्र स्थापन करण्यात यावे, झाडीपट्टी नाट्य अकाडमी स्थापन करण्यात यावी, ‘फिट इंडिया’ कार्यक्रमाला चालना देण्यात यावी व योगाचा प्रसार करण्यासाठी विवेकानंद जयंती ते सुभाषचंद्र जयंतीदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असे प्रस्तावही यावेळी सादर करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने