Top News

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे निधन, कार्यकर्त्यांवर दु: खाचा डोंगर.

Bhairav Diwase. Nov 28, 2020
सोलापूर:- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे, ते 60 वर्षांचे होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती, काही दिवसांतच कोरोनावर मात करुन ते घरी परतले.

मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे.


रूबी हॉल क्लिनिक बाहेर त्यांच्या प्रकृतीबद्दलचे पहिले मेडिकल बुलेटीन दुपारी साडेचार वाजता प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी बा विठ्ठलाकडे प्रार्थना केली. सोशल मीडियातून त्यांच्या प्रकृतीसाठी देवाचा धावा करण्यात आला होता. अखेर, भारत नानांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. भारत भालके यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉल मध्ये येउन आमदार भालके यांना पाहिले. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबतची माहिती घेतली. त्याचवेळी रूपाताई चाकणकर यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस केली.


दरम्यान साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी बाहेर येऊन माहिती दिली होती. आ. भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत तथापि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी झाली. पंढरपुरातूनही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची झुंबड रुबी हॉलच्यासमोर उडालेली दिसत आहे. मात्र, त्यांच्या निधनाचे वृत्त झळकल्याने कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयाबाहेरच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने