डॉ. बाबासाहेंबाची गाणी गाणारा, चळवळ सांगणारा, गावचा पोरगा होणार आमदार......

Bhairav Diwase
राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी काँग्रेसकडून अनिरूद्ध वनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गावात बाबासाहेबाच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम होता. मान्यवरांच्या हस्ते सोपस्कार संपन्न झाले अन् रात्री अनिरूद्ध वनकरच्या प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू झाला. 'निळे वादळ' हे नाटक बघण्यासाठी समोर हजारोंची गर्दी. यावेळी तो म्हणाला गावातल पोरगा म्हणून लहान समजू नका. एक दिवस मी आमदार होणारच. काहींनी टाळ्या वाजवून स्वागत केले, तर हा काय बोलतो म्हणून टिंगलटवाळीही झाली. आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी काँग्रेसकडून अनिरूद्ध वनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि बोरगावातील धम्मबांधवांनी आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेंबाची गाणी गाणारा, चळवळ सांगणारा, गावचा पोरगा आमदार होणार या बातमीन वयोवृद्धांनाच मन भरून आले.

तालुक्यातील बोरगाव हे आंबेडकरी चळवळीचे गाव. याच गावात एका गरीब कुटंबात अनिरूद्ध यांचा जन्म झाला. अनिरूद्ध धोंडू वनकर हे त्याच पूर्ण नाव. गरीब आईवडील शेतमजूरी करून कसाबसा संसाराचा गाडा हाकायचे. घरात दोन भाऊ व तीन बहिणी. बोरगावच्या जिल्हा परिषद शाळेत अनिरूद्धचे सातवीपर्यंतच शिक्षण पार पडले. आठवीनंतर त्यांनी वढोली येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण घेतले. आईवडील मरण पावले. त्यानंतर त्यांनी बल्लारपूर येथे बहिणीकडे राहून पुढील शिक्षण घेतले.

बोरगाव बाबासाहेबाच्या क्रांतीने ओतप्रेत भरलेल गाव यातूनच अनिरूद्ध गाणी गाऊ लागला. नाटकात लहानसहान कामे करू लागला. अशातच शासनाच्या कलापथकाच्या माध्यमातून जनजागृतीचे कामे त्याला मिळू लागली. पुढे तो चंद्रपूरच्या बाबूपेठमध्ये स्थिरावला. तिथूनच खऱ्या अर्थाने त्याच्या सांस्कृतिक चळवळीला बळ मिळाले. मी वादळवारा त्याच्या गाण्याने महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळविली. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अनिरूद्धने उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना काही मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यांनतर झाडीबोली रंगभूमीवर अनेक वर्षापर्यंत एकहाती राज्य गाजविले. त्यांची नाटकं म्हणजे हाउसफुल्ल, असे एक समीकरण तयार झाले होते. तत्कालीन समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या माध्यमातून त्यांना सामाजिक न्यायाच्या जनजागृतीची बरीच कामे केलीत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून अनिरूद्धने दोनदा निवडणूक लढविली व लक्षणीय मत घेतली.

बाबासाहेबाच्या चळवळीला आपल्या वाणीने पुढे नेणारा एक कलांवत, अशी त्याची ओळख आहे. बोरगाव येथे मागील वर्षी बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अनावरण भव्यदिव्य कार्यक्रम झाला. यावेळी सायंकाळी अनिरूद्ध वनकर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. यादरम्यान 'मी एक दिवस आमदार होणारच' हा विश्वास अनिरुद्धने व्यक्त केला होता. शनिवारी राज्यपालाकडे काँग्रेसकडून अनिरूद्ध यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची किनार झळाळली.


गावातील पोरगा आमदार होत आहे, या बातमीने अनेकांना भरून आले. चळवळीची गाणी गाणारा, प्रबोधनातून जागृतीची मशाल पेटविणारे आमच्या बोरगावचे भूमीपूत्र अनिरूद्ध वनकर आता आमदार होणार आहेत. राज्यपालांकडे पाठविलेल्या यादीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या बातमीने बोरगावसह तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
-अभय खोब्रागडे, बोरगाव, गोंडपिपरी


वढोलीच्या सरस्वती विद्यालयात अनिरूद्ध आठवीचे शिक्षण घेताना मी सातवीत होतो. शालेय शिक्षणाच्या वेळी त्याने आपल्या कलेची अनुभूती दाखविली. आता तो आमदार होणार आहे. ही तालुक्यासाठी अभिनंदनाची बाब आहे.