भाजपाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.
चंद्रपूर:- जिल्हयातील घुग्गुस नगर परिषदेची स्थापना त्वरीत करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले.
दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रपूर जिल्हयातील घुग्गुस येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर घुग्गुस ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने वार्ड फॉर्मेशन तथा वार्डाचे आरक्षण सुध्दा जाहीर करण्यात आले आहे. एकीकडे घुग्गुस नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे व दुसरीकडे ग्राम पंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शिवाय आज ग्राम पंचायत निवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. या सर्व बाबींमुळे घुग्गुस वासियांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संभ्रमावस्था दूर करण्याच्या दृष्टीने घुग्गुस नगर परिषद त्वरीत स्थापन करून नगर परिषदेची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी या चर्चेदरम्यान देवराव भोंगळे यांनी केली. याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.
या शिष्टमंडळात घुग्गुस भाजपाचे अध्यक्ष विवेक बोढे, श्रीनिवास इसारप, प्रकाश बोबडे, साजन गोहणे, हसन शेख, श्रीकांत सावे, बबलु सातपुते, संजय पडवेकर, समीर खान यांची उपस्थीती होती.