तीन दिवसापासून वसाहती परिसरात भीतीचे वातावरण झाले निर्माण.
चंद्रपूर:- वेकोलि एकता नगर वसाहतीत पट्टेदार वाघ व पट्टेदार वाघाची पिल्ले या परिसरात वावरत असल्याचे नागरिकांनी मध्यरात्री बघितले असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माजरी एरियातील चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुन्हाळा येथील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी बंद असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगले तयार झाले आहे. येथे अन्य वन्य प्राण्याचे वावर तयार झाले आहे. मागील एका वर्षापूर्वी सिरणा नदीच्या पात्रात पडून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यातच आता विजासन प्रभागा समोरील एकतानगर वसाहतीत पट्टेदार वाघ रात्र दरम्यान मुक्त संचार करत असताना एकता नगर कॉलनी येथील पोटे यांनी प्रत्यक्षदर्शी बघितले असल्याचे सांगितले. तर कामावरून येणाऱ्या वेकोली कामगारांनी सुद्धा बघितले असल्याने तीन दिवसापासून वसाहती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात रात्रो तसेच पहाटे फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याबाबतची माहिती वेकोलि प्रशासनाला दिली असल्याचे सांगण्यात आले.