Top News

चंद्रपुरात थोरात किंवा देशमुखांसारखे पालकमंत्री द्या.

विदर्भ किसान म. काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घरचा अहेर.

अवैध धंद्यांचा ऊत रोखण्यास अपयशी ठरल्याचा ठपका.
 Bhairav Diwase. Dec 28, 2020
 चंद्रपूर:- २६ डिसेंबर चंद्रपूर जिल्ह्यात एव्हाना अवैध धंद्यांना मोठा ऊत आला असून, सर्रास अंमली पदार्थ आणि दारूचा पूर वाहतो आहे. रेती आणि कोळसा तस्करी कमालीवर असून, कोंबडबाजारातून लाखोची सट्टेबाजी रोजचा विषय झाला आहे . कायदा व सुव्यवस्था नावालाच उरली आहे. कोरोनाबाबतही शासकीय व्यवस्था अपयशी ठरली असून, खाजगी दवाखान्यातील मृत्यूदर १० टक्के, तर शासकीय दवाखातील मृत्यूदर ९० आहे. हा जिल्यातील नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणाचा परिपाक आहे. असा आरोप करीत चंद्रपूर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात किंवा अमित देशमुखांसारखे कतृत्ववान नेतृत्व पालकमंत्री द्यावे, अशी मागणी विदर्भ किसान मजदूर संघातर्फे अखिल भारतीय अ. भा. काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना करण्यात आली आहे.

      काँग्रेस वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला, २६ डिसेंबर रोजी एका निवेदनाव्दारे विदर्भ किसान मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे यांच्यासह एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल तिवारी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण पुगलिया आदींनी ही मागणी केली आहे. निवेदनात विद्यमान पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे संधान साधत नमूद केले आहे की, जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय दवाखान्यांमधील रिक्त पदांमुळे कोरोना महामारीदरम्यान यथायोग्य पावले उचलली गेली नाही. 

      तसेच जिल्ह्यात गुंडागर्दी वाढली. असून, खुलेआम ब्राउन शुगर, गांजा, अफिम आदींची तस्करी होत आहे. दारूबंदी असताना जिल्हा प्रशासन राजकीय दबावात त्यावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरली आहे. रेती आणि कोळसा तस्करीसह आता कोंबडबाजारही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रूजला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला एकमेव जागा देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील हे चित्र फार चिंताजनक असून, काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बाळासाहेब थोरात किंवा अमित देशमुख यांच्यासारख्या निष्ठावान आणि जबाबदार नेत्यांना देण्यात यावे. जेणेकरून काँग्रेस संघटन मजबूत होईल आणि जनतेलाही न्याय देता येईल, असे निवेदन सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांनाही पाठविण्यात आले आहे.

सोमवारी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे धरणे......
सोमवारी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे धरणे जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांचे निराकरण करावे, या मागणीसाठी सोमवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या कालावधीत धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आतापर्यंत २९२ जणांना प्राण गमवावे लागले आहे. हा मृत्यूदर ९ ० टक्के आहे. तर खाजगी रूग्णालयात मृत्यूचे प्रमाण २२ म्हणजेच, तेथील मृत्यूचा दर १० टक्के आहे. यासह अन्य ज्वलंत प्रश्नांवर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

 (तभा वृत्तसेवा)
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने