राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा "भारत बंदला" पाठींबा.
नागपुर-चंद्रपुर महामार्गावर निदर्शने व रस्ता जाम.
चंद्रपूर:- केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील दुकाने, बाजारपेठ बंद करण्यात आली होती. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
चंद्रपूर शहरात सकाळी काँग्रेसचा प्रमुख मार्गाने मोर्चा निघाला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारचा निषेध करीत मोर्चा प्रमुख मार्गाने निघाला. शेतकरीविरोधी कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढली. दुचाकी रॅली प्रमुख मार्गाने निघाली. यात शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बंदला पाठींबा दिला होता. स्थानिक जनता कॉलेज चौकात अकरा वाजता निदर्शने केली. घोषणा दिल्या. यावेळी गर्दी जमल्याने काही वेळेसाठी रस्ता जाम झाला होता. कृषीप्रधान देशात शेतकरीविरोधी कायदे होऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करीत शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, सचिव विजय मालेकर, कार्याध्यक्ष बबन राजूरकर, डॉ. संजय बरडे, संजय सपाटे, आल्हाद बहादे, रविकांत वरारकर, मंगेश पाचभाई, जिल्हा महिला अध्यक्षा ज्योत्सना राजूरकर, विद्या शिंदे, मंजुळा डुडुरे, राहुल ठाकूर, जितेंद्र बुचे, सचिन थिपे, प्रकाश गाठे यांची उपस्थिती होती. बंददरम्यान औषधी दुकाने, पेट्रोलपंप वगळता सर्वच प्रतिष्ठाने बंद होती.