आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय.
चंद्रपूर:- ग्राम पंचायत निवडणूकीसाठी उमेदारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्याची परवानगी देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. मदान यांच्याकडे केली होती. सदर मागणीला त्वरीत सकारात्मक प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र पारंपरिक पध्दतीने अर्थात ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दिनांक 29 डिसेंबर रोजी निर्देश पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांसाठी निर्गमित केले आहे.
बीएसएनएल च्या नेटवर्क मधील अनियमिततेमुळे उमेदारांना त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय मंदगतीने इंटरनेट चालु असल्याने उमेदवार त्रस्त झाले आहेत. लोकशाहीमध्ये ज्या निवडणूकीला गावपातळीवरील विधानसभा म्हटले जाते अशा ग्राम पंचायत निवडणूकीमध्ये उमेदारांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतच गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील इतरही जिल्हयांमध्ये ही समस्या उमेदारांना सहन करावी लागत आहे, याकडे आ. मुनगंटीवार यांनी श्री. मदान यांचे लक्ष्य वेधले. श्री. मदान यांनी याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन सुध्दा दिले होते. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत त्वरीत निर्णय घेतला असून 29 डिसेंबर रोजी सर्व जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ सुध्दा 30 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत वाढविण्यात आली आहे.