"या" जिल्ह्यात विषारी दारूमुळे ५ वर्षात एकही मृत्यू नाही.
गडचिरोली:- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसातच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी काही युक्तीवादही करण्यात आले होते. विजय वडेट्टीवार आणि माजी राज्यमंत्री आमदार धर्मराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारू वाढली असून त्यामुळे माणसे मरत आहेत. बायका विधवा होत आहेत. याचबरोबर मृत्युदर वाढला आहे. त्यामुळे या जिल्ह्याची दारूबंदी उठवा अशी मागणी केली होती. यानंतर आता डॉ अभय बंग यांनी मंत्री महोदयांचा हा दावा कोटा असल्याचे सांगितले आहे.
सर्च या संस्थेत दरवर्षी जवळपास एक लक्ष लोकसंख्येची जन्म मृत्यूची नोंद होत असते. यामध्ये मृत्यू दर वाढल्याचे कुठेही दिसून येत नाही.
यासंदर्भातील सत्यता तपासण्यासाठी डॉ. अभय बंग यांनी पोलिस विभागाला अशा प्रकारे झालेल्या मृत्यूची संख्येची आकडेवारी मागितली होती. पोलिस विभागाने गेल्या पाच वर्षात विषारी दारूमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे लेखी पत्र त्यांना दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच आमदार धर्मराव आत्राम हे लोकांना खोटी माहिती का देत आहेत? असा प्रश्न डॉ. बंग यांनी उपस्थित केला आहे.
भारतात विषारी दारूने मृत्यू झाल्याच्या सर्वात जास्त घटना ह्या दारूबंदी नसलेल्या भागात होत असतात. मुंबईतील खोपडी, बंगाल, ओरिसा तामिळनाडू या राज्यात अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. या राज्यांमध्ये दारूबंदी नाही. दारू सरकारी असली म्हणजे ती निरोगी असते हा दावा फोल आहे. दरवर्षी सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू होत आहे. दारू सुरू झाली तर गडचिरोली जिल्ह्यातील लोकांची सुमारे सहाशे कोटींची लूट होणार असून. या जिल्ह्यातील 838 गावांमधील लोकांनी या जिल्ह्यातील दारूबंदी उपयोगी असून ती परिणामकारक असल्याने उठवू नये अशी मागणी राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे अभय बंग यांनी सांगितले.