चंद्रपूर:- कॉंग्रेस पक्षासाठी गटबाजी काही नवीन नाही. पण नुकत्याच झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात कॉग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेली एकजुट अनेकांना हादरा देणारी ठरली. पण चंद्रपुरातील कॉंग्रेसची गटबाजी थांबता थांबत नाहीये. माजी खासदार पुगलिया गटाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात दंड थोपटले. विदर्भ किसान मजदूर संघाने पक्षाध्यध्या सोनिया गांधी यांच्याकडे वडेट्टीवारांची तक्रार करून पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असलेला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळा परिसर आज जिल्ह्यात वेगळ्या कारणाने चर्चेत आला.
पक्षाचा वर्धापन दिवस देशभर विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मात्र, चंद्रपुरात काँग्रेसने आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्याविरोधातील पक्ष कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन अनुभवले. काँग्रेसमधील दिग्गज नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या गटाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात एक मोठी आघाडी उघडली आहे. जिल्ह्यातील दारू तस्करी, वाळू तस्करी, कोळसा तस्करी यांसह अमली पदार्थाच्या विक्रीत होत असलेली वाढ. भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने पैसा कमावण्यासाठी उद्युक्त केले जाण्याचे प्रकार पालकमंत्र्यांच्या काळात वाढीस लागले असल्याचा आरोप पुगलिया गटाने केला आहे.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करून काँग्रेसला बदनामीपासून वाचवण्यासाठी वडेट्टीवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली. आज चक्क या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करून स्वतः नरेश पुगलिया त्यात सहभागी झाले. त्यांनी जिल्ह्यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काँग्रेस पक्षाला सन्मान मिळवून देण्यासाठी निष्ठावान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अथवा अमित देशमुख यांच्यासारखा पालकमंत्री चंद्रपूरला द्यावा, अशी मागणी केली. चंद्रपुरात काँग्रेसमधील दुफळी नवीन नाही. मात्र विजय वडेट्टीवार यांचा राज्यभरातील ओबीसी नेता असा उत्कर्ष होत असताना चंद्रपुरात मात्र त्यांना अशा पद्धतीने पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी घेतलेल्या या भूमिकेचे नक्की काय होते, याकडे काँग्रेसजनांसह राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.