Top News

नियमबाह्य शपथपत्र तयार करणाऱ्यावर त्वरीत कारवाई करा.

विदर्भ आदिवासी माना जमात कृती समितीची मागणी.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातून 'माना' या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळविण्याकरीता कराव्या लागणा-या अर्जासोबत खास नियमबाह्य वेगळे शपथपत्र तयार करण्यात आले असून असे शपथपत्र तयार करणाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा खणखणित इशारा विदर्भ आदिवासी माना जमात कृती समितीचे मुख्य संयोजक नारायणराव जांभुळे यांनी एका निवेदनाद्वारे वरोरा उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे.

        उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातून 'माना ' या जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळविण्याकरीता अर्जासोबत खास नियमबाह्य वेगळे शपथपत्र भरुन मागितले जाते. हे शपथपत्र वरोरा तहसील कार्यालयाअंतर्गत सेतू केंद्रातून दिले जाते. या शपथपत्रात सहाव्या क्रमांकावर ' माना ' जमातीबाबत मी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचा अर्ज, दावा किंवा कारवाई करणार नाही,असे नमुद करण्यात आले आहे.

                    अधिनियम-२००३ नुसार नमुना अ-१ नियम ३(२) मध्ये अर्जदाराने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या अर्जासोबत सक्षम प्राधिका-याकडे सादर करावयाच्या शपथपत्राचा नमुना दिला आहे.परंतू माना जमातीसाठी नियमबाह्य शपथपत्र मागितले जाते. त्यामुळे दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जांभुळे यांनी केली आहे. यासंदर्भात नारायणराव जांभुळे यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांची दि.२४ डिसेंबर रोजी भेट घेऊन सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळात विदर्भ आदिवासी माना जमात कृती समितीचे अध्यक्ष बळीराम गडमडे, विजेंद्र नन्नावरे, डाॅ.प्रणित जांभुळे, डाॅ.रुपाली गायकवाड, चंद्रपूर जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड, पंढरी सोनवाणे, आशिष नन्नावरे यांचा समावेश होता. 
                      
        दरम्यान, दि.२ जानेवारी पर्यंत दोषीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जांभुळे यांनी दिला आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे मुख्य सचिव व इतरांना पाठविण्यात आल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने