रस्त्यावरील अतिक्रमित बांधकाम व ब्रेकर हटविण्याची मागणी.

Bhairav Diwase
वारंवार तक्रारीनंतर ही नगर परिषदेचे दुर्लक्ष.

संबंधित अभियंत्यास निलंबीत करण्याची मागणी.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा शहरातील आठवडी बाजार वार्डामध्ये इंदिरा शाळेच्या मागच्या बाजूस एका गृहस्थाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून जिना (पायऱ्या) बांधकाम केला आहे. याबाबत नगर परिषदेतील बांधकाम व अतिक्रमण विभागात मागील वर्षभरापासून अनेक तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याचे वॉर्डवसीयांकडून तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. तसेच संबंधित अभियंत्यास निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
        
    आठवडी बाजार वार्डातील इंदिरा शाळेमागील परिसरात अगदी अरूंद रस्त्यावर एका गृहस्थाकडून अवैधपणे जिन्याचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच याच रस्त्यावर अवैध व अनावश्यक अगदी 2-2 मीटरच्या अंतरांवर गतीरोधक (ब्रेकर) तयार करण्यात आले असून या गतीरोधकांमुळे नियमीत याठिकाणी किरकोळ अपघात घडत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून वारंवार नगर परिषदेतील बांधकाम व अतिक्रमण विभागात तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून आश्वासने देवून रहिवास्यांची समज काढण्याचे काम केले आहे. अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरले आहे, न.प. कर्मचारी सुट्टीवर आहे, तर कधी आचारसंहितेचे कारण देत मागील अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण काढण्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. प्रत्यक्षात आद्यप कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. अधिकाऱ्यांसोबतच नगराध्यक्ष व या प्रभागातील नगरसेवक ही मताच्या लालसेपोटी अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. न.प. पदाधिकारी व अधिकारी-अभियंता यांच्या अनास्थेमुळे मात्र रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
             
     अगदी अरूंद रस्त्यावरील अतिक्रमण व गतिरोधक यामुळे कुणाचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न ही नागरिकांकडून करण्यात येत आहे. मागील अनेक महिन्यापासून कार्यरत अभियंत्याने नागरिकांची दिशाभूल केल्याने या अभियंत्यांचे निलंबन करण्याची मागणी रहिवाशांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. तातडीने अवैध अतिक्रमण व ब्रेकर हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.