चंद्रपूर:- 21 डिसेंबरला दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहणाऱ्या श्रीमती गंगा विजयकर यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दुर्गापूर पोलीस स्टेशनला मिळाली होती. विजयकर यांचे घरून सोन्याचे दागिने, सोन्याचा गोफ, चेन टॉप्स, सोन्याचं डोरल, जोडी गहूमनी व पिटीव मनीपोत, सोन्याचे पदक, डोरल, १ नग पिटीव मनी, बेसर, 64 ग्रामची चांदीची चाळ, गोफ 8 ग्राम, 2 अंगुठ्या असा एकूण 1 लाख 37 हजार 970 रुपयांचा माल चोरी गेला असल्याची खात्रीशीर माहिती गंगा विजयकर यांनी दिली असता 380 अनव्ये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुर्गापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, मनोहर जाधव व सूरज लाटकर यांनी एका संशयिताला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बेघर कॉलनी निवासी 23 वर्षीय पृथ्वी अशोक तायडे असल्याची खात्री पटली. सदरील चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.