चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घटना.
गोंडपिपरी:- राज्यात सर्वत्र बर्ड फ्लूची दहशत पसरली असताना गोंडपिपरी तालुक्यातील नवेगावात(वाघाडे) महिनाभरात तीनशेहून अधिक कोंबड्यांच्या अज्ञात आजाराने मृत्यू झाला.
सदर प्रकाराने परिसरात धास्ती पसरली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे. चंद्रपूर अहेरी मार्गावरील गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव (वाघाडे) या दीड हजार लोकसंख्येच्या गावात पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील लोकांचा शेती व्यतिरिक्त पूरक व्यवसाय म्हणून ते पशूची जोपासना करतात.
गावातील बहुतांश कुटुंबाकडे दोन-चार अशा प्रमाणात कोंबड्या आहेत .राज्यात सध्या बर्ड फ्लूची साथ पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .नवेगाव (वाघाडे) गावात मागील महिन्याभरापासून कोंबड्यांच्या अज्ञात आजाराने ग्रासले आहे.
एवढ्या दिवसापासून हा प्रकार सुरू असताना याबाबत कुठलीही उपाययोजना झाली नाही.पर्यायाने मागील आठवड्यापासून या आजाराची तीव्रता चांगलीच दिसू लागली आहे. दरम्यान आतापर्यंत तीनशेहून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. अश्यावेळी कोणत्याही रोगाची लक्षणे आढळून न येता अचानक कोंबड्यांच्या होणाऱ्या मृत्यू खरंच चिंताजनक आहे. यावर पशुधन विभाग काय कारवाई करणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.