रेती तस्करांनी उडवली वाघांची झोप.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 24, 2021
गोंडपिपरी:- वाघांची आणि इतरही वन्यजीवांची मुबलक संख्या असल्याने शासनाने चंद्रपुरात कन्हाळगाव अभयारण्याची निर्मीती केली. पण येथील वाघांची आता पुरती झोप उडाली आहे. आणि त्याला कारणीभूत ठरलेत वाळूतस्कर. गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या अधिवास क्षेत्रातील नाल्यातून खुलेआम वाळूतस्करी सुरू आहे. पण वनविभाग झोपेत आहे का? चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका वनवैभवाने संपन्न आहे. इथं मोठ्या प्रमाणावर खनिज आणि वनसंपत्ती आहे. हे खनिज लुटण्यासाठी तस्करांचं एक मोठं जाळं तालुक्यात सक्रिय आहे. सध्या गोंडपिपरी, धाबा, सुकवासी इथं रस्ता बांधकाम सुरू आहे.

या रस्ता कामात अनेक ठिकाणी पाईपलाईनची कामे करण्यात येत आहेत. या कामासाठी लागणारी वाळू लगतच्या चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून आणली जात आहे.

अगदी कमी वेळात वाळू उपलब्ध होत असल्यानं हे काम करणारे कंत्राटदारदेखील चिवंडा नाल्यातील वाळूच्या मागे लागले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगावला शासनाने नुकतेच अभयारण्य घोषित केले. कन्हाळगाव अभयारण्यात येत असलेलं चिवंडा जंगल हे वाघांच्या अधिवासासाठी अतिशय उपयुक्त आहे. या भागात अनेक वाघांचा अधिवास आहे व याच चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून तस्कर वाळूचा मोठया प्रमाणावर उपसा करीत आहेत.

रात्रभर इथं मोठया प्रमाणावर वाहनांची ये-जा असल्यानं इथल्या वाघांची पुरती झोप उडाली आहे. शिवाय वाघांच्या सुरक्षेसाठी ही अतिशय घातक बाब ठरली आहे. हा भाग सध्या वनविकास महामंडळात मोडतो. पण या तस्करीकडे वनविभागाचं कमालीचं दुर्लक्ष होत आहे. तालुका प्रशासनानं या तस्करांना आशीर्वाद दिला की काय? अशी परिस्थिती आहे. एकीकडे वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता शासनस्तरावर मोठ्यामोठ्या योजना आखल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादानं वन्यजीवांपुढे नवीन संकट उभं ठाकलं आहे.