Top News

जनावरांच्या चाऱ्यातून दारुतस्करी; ३७ लाख रुपयांचा माल जप्त

Bhairav Diwase. Jan 25, 2021
चंद्रपूर:- वाशिम जिल्ह्यातून जनावरांच्या चा-यात लपवून आता दारू तस्करीचा प्रकार समोर आला आहे. असा दारूतस्करी करणारा ट्रक पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. सदर कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटा चौकीजवळ करण्यात आली. यावेळी सुमारे ३७ लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान याप्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात दारूतस्करी व अन्य अवैध व्यवसायावर आळा घालण्याच्या दृष्टीने आठ पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाद्वारे जिल्हाभर पाळत ठेवली जात आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथून येणाऱ्या ट्रकद्वारे मूल येथील प्रफुल्ल दिलोजवार याच्याकडे दारूचा पुरवठा होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने चंद्रपूर-मूल मार्गावर नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू केली. त्यावेळी ट्रकची तपासणी केली असता गुराच्या चा-यात देशीदारूचा साठा लपवून असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी तेथून देशी दारूच्या ७० पेट्या व ट्रक जप्त केला. त्याची किमत सुमारे ३७ लाख ४७ हजार रुपये आहे. यावेळी नकिब खान अमनुल्ला खान, मोहम्मद अब्दुल मोहम्मद सलीम (दोघेही रा. वाशिम) या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, प्रफुल्ल दिलोजवार हा फरार आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात सुरू आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या दुस-या पथकाने चंद्रपुरातील महाकाली कॉलरी परिसरातून २४ देशी दारूच्या पेट्या जप्त केल्या आहेत. त्याची किमती दोन लाख ४० हजार रुपये आहे. सदर कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. तिरुपती झाडे, राजू झाडे हे दोघे फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने