Click Here...👇👇👇

गोंडवाना विद्यापीठाचा झाला राजकीय आखाडा.

Bhairav Diwase
स्थानांतरणावरून वाद; पण दीक्षांत समारंभ गडचिरोलीत.
Bhairav Diwase. Jan 20, 2021
गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा चंद्रपुरात आयोजित करण्यावरून वादंग सुरू असताना आमदार किशोर जोरगेवार यांनी कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांना गोंडवाना विद्यापीठ चंद्रपुरात आणण्याची मागणी केली. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजप नेतेसुद्धा चिडले आहेत, तर चंद्रपुरात होऊ घातलेला दीक्षांत सोहळा आता गडचिरोलीतच पण, आभासी पद्धतीने घेण्याची अधिसूचना विद्यापीठाने काढली आहे. मात्र, यातून या विद्यापीठाचा राजकीय आखाडाच झाल्याचे दिसून येत आहे.

        असे असले तरी तो कुलपती किंवा कुलगुरूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीत न होता आभासी म्हणजे ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची अधिसूचना विद्यापीठाकडून मंगळवारी काढण्यात आली. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने अगदी जुजबी कारणे पुढे करून दीक्षांत सोहळा चंद्रपूर येथे घेण्याचा घाट घातला होता. या विरोधात सर्वांत आधी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात विद्यापीठाच्या आवारात मुंडण आंदोलन करून घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. एकीकडे दीक्षांत सोहळ्यावरून गदारोळ सुरू असताना आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेत गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूरला स्थलांतरित करण्याची मागणी केली.

     त्यामुळे काँग्रेससोबत जिल्ह्यातील भाजपचे नेतेही संतप्त झाले. विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी चंद्रपुरात होऊ घातलेल्या दीक्षांत समारंभाविरोधी भूमिका घेतली. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी यांनीसुद्धा राज्यपाल व आमदार सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून दीक्षांत समारंभ गडचिरोलीतच घेण्याची भूमिका मांडली.
     
      विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांनीही तीव्र विरोध दर्शविला. हा तीव्र विरोध लक्षात घेता आमदार मुनगंटीवार यांनी राज्यपालांशी चर्चकरून समारंभ गडचिरोलीतच घेण्याची विनंती केली. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाने सोमवारीच विद्यापीठाला या संदर्भात सूचना देत दीक्षांत समारंभ गडचिरोलीतच घेण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यपाल येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याचेही स्पष्ट केले. दीक्षांत समारंभाचा तिढा सुटला, तरी विद्यापीठ हलविण्याच्या मुद्यावरून राजकारणाचा आखाडा पुढे काही दिवस गरम राहणार आहे.