स्थानिक राजकारण्यांनी डावल्याचा आरोप.
चंद्रपूर:- "मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर माझी नाराजी नाही मात्र स्थानिक राजकारणी आणि प्रशासनाने दौऱ्यात स्थानिक आमदाराला बोलावलं नाही" असा आरोप करत भाजपा आमदार बंटी भांगडीया यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र, ठाकरेंच्या दौऱ्याविषयी आ. बंटी भांगडीया यांना कळवण्यात आले नव्हते. याच कारणामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांवर राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोसीखुर्द धरण आणि परिसरातील सिंचन व्यवस्थेची पाहणी केली. मात्र ठाकरेंच्या या दौऱ्याबद्दल प्रशासन आणि स्थानिक राजकारण्यांनी कुठलीही माहिती न दिल्याचा आरोप भाजपा आमदार बंटी भांगडीया यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याबद्दलची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळायला हवी होती. मात्र ती मला माध्यमातून कळत आहे. याबाबत प्रशासनाला विचारले असता आम्ही तुम्हाला का बोलावलं नाही, हे तुम्ही समजू शकता अशा प्रकारचे उत्तरं दिली जात आहेत, असे भांगडीया म्हणाले. तसेच त्या भागातील राजकारण्यांनी मुद्दामहून डावलल्याचा आरोप बंटी भांगडीया यांनी केला.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्या मतदारसंघात पाहणी करत आहेत. त्या भागातील प्रश्न मला माहीत आहेत. मी शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगू शकलो असतो. मात्र मला डावलण्यात आल्याची तक्रार भागंडीया यांनी केली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सांगणार आहे. घडलेल्या प्रकाराविषयी पत्रव्यवहार पण करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नांवर राजकारण करायला नको होतं असे म्हणत त्यांनी तेथील स्थानिक नेत्यांवर टीका केली.